दि. 09/042025*
*सीएसआर अंतर्गत सहकार्याच्या दिशेने जि.प.चे पाऊल*
*जिल्हा परिषद नाशिकच्या उपक्रमांची कंपन्यांना क्षेत्रभेट*
नाशिक – जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने आज जिल्ह्यातील ३० औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांची प्रत्यक्ष अनुभवातून माहिती देण्यासाठी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली, एसबीआय संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेस देण्यात आलेल्या बसमधून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह सर्व औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख यांनी प्रवास केला. या क्षेत्रभेटीचा उद्देश म्हणजे कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक कृतज्ञता निधी (सीएसआर) अंतर्गत या उपक्रमांना सहकार्य करावे, त्यातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळावी, असा आहे.
क्षेत्रभेटीची सुरुवात जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेपासून करण्यात आली. येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक व शैक्षणिक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषिक क्षमतेचा विकास करणाऱ्या 'स्पेलिंग बी' स्पर्धेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सर्जनशीलता वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
यानंतर औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समावेशक कृती केंद्राची पाहणी केली. हे केंद्र विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आले असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमुळे दिव्यांग मुलांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षणाची सुविधा मिळत असल्याची माहिती येथील शिक्षकांनी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली.
गट संसाधन केंद्राची पाहणी करताना ‘मिशन आत्मनिर्भर’ अंतर्गत जिल्ह्यातील १५ गट संसाधन केंद्रांमध्ये कोणताही निधी न घेता सुधारणा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या केंद्रांतून शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा व शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत.
यावेळी नाशिक येथील टाकेकर शिक्षण संकुलातील 'सुपर फिफ्टी' उपक्रमाचीही माहिती घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपात NEET आणि JEE या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणारा हा उपक्रम आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी आपली अनुभवकथन करताना या उपक्रमामुळे त्यांना आयुष्य घडवण्याची नवी दिशा मिळाल्याचे नमूद केले.
यानंतर प्रतिनिधींनी पिंपरी सैय्यद ग्रामपंचायतीस भेट दिली. येथे ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत उभारलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन केंद्राची पाहणी करण्यात आली. ग्रामविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी माहिती दिली की, हे केंद्र तालुकास्तरीय असून, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात असे केंद्र कार्यरत आहे. प्लास्टिक गोळा करणे, वर्गीकरण व त्याचे पुनर्वापरासाठी व्यवस्थापन करणे यासाठी संस्था नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.
ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांची माहिती ग्राम पंचायत अधिकारी दौलत गांगुर्डे यांनी दिली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा, उपलब्ध साधनसंपत्ती आणि विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी याची माहिती कंपनी प्रतिनिधींना देण्यात आली.
या क्षेत्रभेटीच्या शेवटी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल व महिला आणि बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी सहभागी कंपन्यांना सीएसआर अंतर्गत जिल्हा परिषदेच्या उपक्रमांना मदत करण्याचे आवाहन केले. कंपन्यांचे प्रतिनिधीही या उपक्रमांबाबत भारावून गेले असल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना असे सांगितले की, “जिल्हा परिषद नाशिककडून राबविण्यात येणारे उपक्रम हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. अशा उपक्रमांमध्ये आमच्या सीएसआर निधीमधून सहकार्य करणे ही आमच्यासाठीही अभिमानाची बाब ठरेल.”
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता पंकज मेतकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, महिला आणि बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, सहायक गटविकास अधिकारी प्रशांत पवार, रघुनाथ सूर्यवंशी, गट शिक्षणाधिकारी डॉ.मिता चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश निक, विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे, श्रीधर सानप यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमामुळे सरकारी यंत्रणा आणि खाजगी क्षेत्रातील समन्वय अधिक दृढ होणार असून, सामाजिक उत्तरदायित्वाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: