प्रेस नोट दि. १७/०३/२०२५
मिशन आत्मनिर्भर : जिल्हा समावेशित कृती केंद्राचे उद्घाटन
ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
नाशिक : "मिशन आत्मनिर्भर" अंतर्गत जिल्हा समावेशित कृती केंद्र (Inclusive Activity Centre) नाशिक येथे सुरू झाले आहे. समग्र शिक्षा, जिल्हा परिषद नाशिक, इम्पथी फाउंडेशन आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या समावेशित कृती केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
या केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, रेमेडियल टीचिंग, लर्निंग अॅ क्टिव्हिटी आणि पालक समुपदेशन यासारख्या सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध आहेत, भविष्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी नियमित थेरपी सेवा व शिक्षण घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पालकांना केले
शिक्षण विभागाच्या वतीने शासकीय कन्या विद्यालयामागील विस्तारीत इमारतीतील 3 खोल्या शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी या समावेशित कृती केंद्रासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. इमारतीचे नूतनीकरण इम्पथी फाउंडेशन मुंबई यांनी केले आहे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक थेरपी साहित्य, शैक्षणिक साहित्य आणि तज्ञ डॉक्टर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमाला इम्पथी फाउंडेशनचे एम. आर. सुंदरेश्वरम, विश्वस्त मितुल रमेश दमानी, दिनेश झोरे, कपिल, सचिन चौधरी, डॉ. मिता चौधरी (गशिअ नाशिक), प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक गजेंद्र आंबेकर व त्यांची टीम तसेच दिव्यांग विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. मिशन आत्मनिर्भर अंतर्गत जिल्हा समावेशित कृती केंद्राच्या धर्तीवर इतर १५ गट संसाधन केंद्रातही अशाच प्रकारची केंद्रे लवकरच सुरू होणार असल्याचे मा आशिमा मित्तल मॅडम यांनी सांगितले. या केंद्रात बहुविध तज्ञ टीम (Expert Multi-Disciplinary Team) मार्फत एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या थेरपी सेवा दिल्या जातील. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम्फथी फाउंडेशन, प्रथम एज्युकेशन सोबतच उपशिक्षणाधिकारी धंनजय कोळी, डॉ मिता चौधरी गशिअ नाशिक, जिल्हा समन्वयक विजया अवचार, वनिता मंडलिक, नाशिक बीआरसी मधील सर्व विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक आणि तज्ञांनी विशेष परिश्रम घेतले.
या सेवांचा लाभ मिळणार:
1. ० ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत थेरपी सेवा व शैक्षणिक मार्गदर्शन.
2. दैनंदिन कौशल्ये विकसित करून स्वावलंबी बनविणे
3. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक आणि शिक्षक मार्गदर्शन
4. वैद्यकीय सुविधा, शस्त्रक्रिया, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि UDID कार्ड मार्गदर्शन
5. व्यवसायपूर्व कौशल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन
6. सर्व विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN).
7. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समाजात पूरक वातावरण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: